सत्यशोधक युवा परिषद २०२३ कशासाठी ?

0 85

सत्यशोधक युवा परिषद २०२३ कशासाठी ?

 

राहुल विद्या माने, (8208160132)
कार्यकर्ता, सत्यशोधक युवा परिषद

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आपल्या सर्वांना आज एकविसाव्या शतकात सुद्धा मार्गदर्शक आहे. आजच्या ज्ञान-माहिती तंत्रज्ञान युगात सामाजिक न्याय, शाश्वत विकास आणि आर्थिक प्रगती या सर्व ध्येयांकडे वाटचाल करण्यासाठी मानवतावादी मूल्यांची मशाल घेऊन वाटचाल करणाऱ्या सत्यशोधक विचारांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे हे ध्येय साध्य करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांत संविधानाची कास धरून सत्यशोधनाचे कसब युवा पिढीत कसे वाढवता येईल या उद्देशाने वाटचाल करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आगामी काळात सत्यशोधक कामापुढे काय कृती कार्यक्रम असू शकतो यावर मंथन करण्यासाठी ही युवा परिषद अकरा पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन २३ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे येथील एस. एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन मध्ये आयोजित केली आहे. या परिषदेच्या आयोजनात एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका विद्यार्थी समिती, छात्रभारती, हमीद दलवाई रिसर्च सेंटर, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गडकिल्ले सत्यशोधक मोहीम, मासूम संस्था पुणे आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठान या संघटनांचा सहभाग आहे.

अर्धवट माहिती, राजकीय अजेंड्याने केलेला दुष्प्रचार, धार्मिक विखाराचे व्हायरल संदेश, वेगाने ध्रुवीकरण करणाऱ्या फेक न्युज, तांत्रिक क्लृप्त्या वापरून बदनामी करण्यासाठी वापरले जाणारे मिम्स, क्लिप्स, व्हिडिओज, डीप फेक इमेजेस या सर्वांमुळे आपले सामूहिक मानस प्रदूषित होऊन ढवळून निघाले आहे. या सर्व तांत्रिक साधनांचा गैरवापर करून सामाजिक – राजकीय – सांस्कृतिक पातळीवर लोकहिताचा संवाद साधू पाहणाऱ्या प्रयत्नांवर आक्रमण केले जात आहे. हा समाज विघातक बदल कसा घडवून आणला जात आहे हे समजून घेणे या परिषदेचा आणखी एक उद्देश आहे.

तसेच लोकशाहीतील पायाभूत असलेल्या घटनात्मक प्रक्रिया आणि संकेत पायदळी तुडवून तंत्रज्ञानातील प्रगतीचा गैरवापर नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्य तसेच त्यांच्या खाजगीपणाचा हक्क या दोन्हींचे आकुंचन करण्यात या मूलतत्ववादी शक्तींचा सहभाग आहे यावर सुद्धा या परिषदेत चर्चा होईल.

आज पारंपरिक अर्थाने मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे ही आर्थिक – राजकीय दृष्ट्या एकाधिकारशाही सत्तेच्या शरण जाऊन घडामोडींचे सत्य वार्तांकन करण्यामध्ये मागे हटली असताना तिथेही अनेकजण मिळणाऱ्या संधीचा व अवकाशाचा उपयोग सत्यशोधनासाठी करत आहेत आणि ही आशेची बाब आहे.
समाजमाध्यमे व पर्यायी माध्यमे यांच्या अवकाशात काही व्यक्ती, संस्था त्यांच्या परीने हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माध्यमांसंबंधित कामाच्या स्वातंत्र्यावर बंधने किंवा आक्रमणे करून ते करत असलेल्या सत्यशोधनाला सुरुंग लावण्याचे दू: साहस विविध शक्ती करत आहेत. याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागत आहेत. या सर्वांनी सत्यशोधक चळवळी समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.

त्याचबरोबर महापुरुषांची बदनामी, इतिहासाचे विकृतीकरण, अवैज्ञानिक मनोवृत्तीचे सत्तेच्या केंद्राशी झालेले साटेलोटे यामुळे हे आव्हान अधिकच आक्राळविक्राळ, गुंतागुंतीचे आणि भावनिक दृष्ट्या खिळवून ठेवणारे झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे आपल्या शांतीपूर्ण प्रगतीच्या अनेक शक्यता या धुळीस मिळवल्या जात आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन व विवेकवाद यांनी प्रशिक्षित, प्रेरित असा युवा वर्गच आपल्याला दिशा देऊ शकतो असा विश्वास वाटतो.

परिषदेत जमलेले युवा विषारी प्रचाराला, धार्मिक, जातीय द्वेषाला बळी न पडण्याचा आणि सत्यशोधनाची वाट चालण्याचा निर्धार या परिषदेत करणार आहेत. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असताना होणारी ही युवकांची परिषद म्हणूनच महत्त्वाची आहे. या परिषदेचे तुम्हा सर्वांना आमंत्रण !

Leave A Reply

Your email address will not be published.