विंचवाचं तेल (पारधी समाजातील मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी)

0 193

विंचवाचं तेल (पारधी समाजातील मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी)

 

लेखिका – सुनीता भोसले
सहलेखन – प्रशांत रुपवते

 

कोणत्याही देशाचा विकास त्या देशाच्या सामाजिक समतेवर होत असतो. जितकी समता निकोप तितका विकास लवकर होतो आणि जितकी विषमता आधिक तितका देश अधोगतीकडे जात असतो असे मला वाटते. जेव्हा मी भारतीय समाजाकडे पाहते तेव्हा भारतीय समाजातील रूढी, परंपरा, जात, धर्म, स्त्री पुरुष भेदभाव या सर्वांचा परिणाम भारताच्या विकासात नक्कीच बाधा आणत आहे. सध्याच्या परिस्थितीत हा भेदभाव पुन्हा चातुरवर्णपद्धतीकडे घेऊन जाईल की काय अशी भीती देखील वाटायला लागली आहे. याच परिस्थितीत हाती पडलेले हे पुस्तक भारताचे अनेक दुखरे कोपरे आणि त्यांचे वास्तव झापडबंद डोळ्यांची नजर सुधारण्यास मदत करेल असे वाटते.
भारतीय समाजात आजही कैकाडी, गोंधळी, पारधी, डोंबारी असे गावकुसाबाहेर राहणारे समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात.यातील पारधी समाजाचे वास्तव सुनिता भोसले यांनी या अनुभव चरित्रातून मांडले आहे. चोरी, दरोडे, खून, गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे पारधी समाज अशीच ओळख आज संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यातच या समाजाच्या संस्कृती, रुढी, चालीरीतीची भयानकता तर हादरुन टाकणारी आहे. सुनिता भोसले यांचे अनुभव आणि सहलेखक प्रशांत रुपवते यांचे शब्दसमर्थ यामुळे पुस्तक वाचताना अनेकदा डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे उभे राहतात. सुनीताताईच्या मुखपृष्ठावरील करारी छायाचित्रामुळे, प्रसिद्ध लेखिका व बोलीभाषा अभ्यासक गणेश देवी यांच्या मनोगतामुळे पुस्तक वाचण्यास बळ मिळते.
खरंतर सुनिता यांना वाटते पारधी समाजात जन्माला येणे हाच गुन्हा आहे. प्राण्यांचे रक्त पिऊन जगणारा हा समाज अशी या समाजाची ओळख.. या समाजात सुनीता ताई चा जन्म झाला तोच नाकारलेपणातून. त्यामुळे ती इतकी दुर्लक्षित की तिच्या जन्मानंतर पहिला स्पर्श कुत्र्याने केला. वंशाच्या दिव्याची अपेक्षा करताना मुलगी जन्माला आली म्हणून तिच्याकडे कुणी लक्ष दिले नाही आणि त्याचवेळी तिथून जाणाऱ्या एक कुत्र्याने तिला चाटले ही तिच्या जन्माची सुरुवात. पुढील आयुष्य तर धगीने व्यापलेलेच होते. त्यामुळेच आपले अनुभव कथन करताना मी आईला कधीच आवडली नाही असे आईच्या समोर सुद्धा सांगायला कचरत नाहीत. पण हे सांगतानाच आज मात्र माझी आई माझ्यासाठी फार मोठा आधार आहे हे सुद्धा अभिमानाने सांगयला विसरत नाहीत.
पारधी समाजात बाईला(बाई हा शब्द मुद्दामच वापरते) कवडीची किंमत नाही. थोड्या थोड्या कारणाने सुद्धा ती बाटली जाते किंवा तिची चूक नसतानाही एखादा पुरुष बाटला जातो आणि ती शिक्षेस पात्र ठरते. पारधी समाजात एकत्र कुटुंब पद्धती नाही. लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी नवीन नवरा नवरीला त्यांचे पाल मारून दिले जाते आणि त्यांचा स्वतंत्र संसार सुरू होतो. जोपर्यंत नव्या नवरीचे तिच्या पतीशी शारिरीक संबंध येत नाहीत तोपर्यंत ती पवित्र असते पण ज्या दिवशी पासून असे संबंध येतात त्या दिवशीपासून ती बाटली जाते. त्या दिवशीपासून तिच्या हातचे जेवण तिच्या नवऱ्याशिवाय इतर कोणीही खाऊ शकत नाही हा रिवाज आहे. तिच्या साडीचा पदर किंवा साडीचा कोणताही भाग इतर पुरुषाला लागता कामा नये. दुसऱ्यांच्या घरात परवानगीशिवाय तिला जाता येत नाही. तिच्यासाठी आंघोळीला आणि अगदी लघवीला सुद्धा ठरवून दिलेली जागा असते त्या जागे शिवाय इतर कुठेही तिला तिचे विधी करता येत नाहीत. तिला कोणाच्याही वावरात संडासला जातात येत नाही ज्या दिशेला तिच्या घरच्यांनी पहिल्या दिवशी जायला सांगितले आहे त्याच दिशेला तिला संडासला जावे लागते. तिची कपडे तिला कधीही पालात ठेवता येत नाहीत. मग तिची साडी चार हजार रुपयांची असेल तरीसुद्धा ऊनापावसात पालाच्या बाहेरच ठेवावी लागते ती सुद्धा अशा ठिकाणी की वाऱ्याने कुणाच्या अंगावर येतात कामा नये. स्वतःचे बाळंतपण पण तीला स्वतः करावे लागते. इतर बायका फक्त बाळाचे डोके बाहेर येईपर्यंत तेल लावून चोळतात किंवा काही सूचना देण्याचे काम करतात काही वेळा बाळ बाहेर येत नसेल तर तिच्या नवऱा तिचे उदर पायाने दाबतो. काही वेळा तर नवरा पायानेच ब्लेड पकडून कोणत्याही भुलीशिवाय जागा मोठी केली जाते. त्यानंतर बाळाची नाळ कापणे, ती जागा स्वच्छ करणे, बाळाला आणि स्वतःला स्वच्छ करणे हे सर्व काही क्षणात त्या बाळंतिणीलाच करावे लागते. अगदी दूर अंतरावरून पोट चोळणाऱ्या बायका तिला सूचना देत असतात. तिचे बाळंतपण तिचा सासरा जवळ बसून पाहतो. ज्या जागेवर ती आंघोळ करते त्या जागेवरच तिचं बाळंतपण होतं आणि त्या जागेवरच पहिले पाच दिवस तिला राहावे लागते. पहिल्या पाच दिवसात लांबूनच एखाद्या भांड्यामध्ये तिला जेवण दिले जाते. उन्हाळा पावसाळा असेल तरीसुद्धा पालाच्या बाहेरच तिला हे दिवस काढावे लागतात. पाचवी केल्यानंतर तिला पालात घेतले जाते.आज काही सुशिक्षित बायकांचा संपर्क आल्यावर त्या विचारतात तुम्ही इतक्या धडधाकट आहात, हे सगळे सहन करता मग खाता तरी काय? अशावेळी उत्तर तरी काय द्यावे असे सुनिताताईंना प्रश्न पडतो.
अशा या समाजात जात पंचायत नावाची भयानक समिती असते.अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी सुद्धा पंचायत बसते या पंचायतीला हायकोर्टचा आदेश सुद्धा मान्य नसतो. पोलीस सुद्धा यांना मिळालेले असतात. जातपंचायतीचे सदस्य आणि पोलीस गुन्हेगाराकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतात. काही वेळा न केलेल्या गुन्ह्यासाठी सुद्धा असा जुर्माना भरावा लागतो. या समाजात जन्मलेली सुनिता सुरुवातीच्या काळात भीक मागून आपला उदरनिर्वाह करते. आपला लहान भाऊ अविनाश याच्यावर तिचे जीवापाड प्रेम असते आणि अविनाशचे सुनीतावर. दोघे भावंडे एकमेकांच्या भुकेची परवा करत गावभर हिंडून भीक मागून जगत असतात. मोठी बहीण अनिता थोडी स्वार्थी असते पण तिच्यावरच आईचे अधिक प्रेम होते असे सुनिताताईं सांगतात. वडील प्रामाणिक, लढवय्ये आणि न्यायी होते. ते जात पंचायतीचे मुखिया होते. पण त्यांच्या या स्वभावाचाच लोकांना त्रास होऊन त्यांचा खून केला. पारधी समाजातील ९०% पुरुषांवर चोरी, दरोडे आणि खुनाचे आरोप असतात या समाजाला जातीचा दाखला मिळत नाही त्यामुळे दहावीपर्यंत शिकून सुद्धा अनेक मुलांना अगदी पोलीस भरती सुद्धा होता येत नाही याची सुनीताताईला खंत वाटते. याच समाजात वावरताना आजूबाजूचे लोक मात्र तिला सच्चे वाटतात. मग ते वेगळ्या जातीचे असतील तरीसुद्धा. गरम भाकरी भीक म्हणून देणारे गावकरी, शाळेत हुशार म्हणून शाळेला मिळालेल्या टेलिफोनवर पहिल्यांदा बोलायला देणारे शिक्षक, गावातल्या एका लग्नात दिवसभर खरकट्यातल्या बुंदी गोळा केल्यानंतर ती पिशवी कुत्र्याने पळून नेली यासाठी ताज्या बुंदी देणारा लग्नातील यजमान, संघटनेच्या कार्यासाठी प्रोत्साहन देणारे जिजा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारधी समाजाची पहिली महिला कार्यकर्ते म्हणून पुढे येण्यासाठी बळ देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार.
जो पारधी समाज आजही दारिद्र्याच्या, अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात सापडला आहे तो समाज खालच्या जातीच्या लोकांना आपल्यात घेत नाही हे कटू सत्य खूपदा सुनीताताईला हलवून टाकते. तिने घरात पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला हे सुद्धा तिच्या घरच्यांना आणि समाजाला न रुजणारे होते. पण सुनीताताई अभिमानाने सांगते की आज या समाजाचे प्रश्न सोडवताना ज्या आधारावर मी उभी आहे तो आधार म्हणजे बाबासाहेब आणि त्यांचे विचार. शाळेच्या पाच इयत्ता पार करून सहावी इयत्ता थोडीफार अनुभवलेली सुनीताताई आज पारधी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावत आहे. ती सांगते तिच्या आईबाबांचे लग्न १९७२ ला झाले त्यानंतर दहा-बारा वर्षांनी मोठी बहीण. मोठी बहिणी आणि सुनीतामध्ये सात आठ वर्षांचे अंतर. यावरून सुनिताताईचे वय काढले तर फार फार तर आज सुनीताताई पस्तीसी मधील. पण या पस्तीशीतील सुनिता ताईने अकराव्या वर्षापासून समाजकार्याचा वसा घेतला. अकराव्या वर्षी सहाशे किलोमीटरची पदयात्रा केली.समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.जे विंचवाचे तेल गुन्हेगाराला गुन्हा कबूल करण्यासाठी वापरले जाते म्हणजेच गुन्हेगारी संपवण्यासाठी वापरले जाते. तेच विंचवाचे तेल वापरून सुनिताताईला तिच्या समाजातील जे जे वाईट आहे ते संपवायचे आहे.
तरीही आज वडिलांच्या जमिनीसाठी ती हायकोर्टात लढते आहे.( बहुतेक हायकोर्टात जाणारी ही पारधी समाजातील पहिलीच केस आहे.) स्त्रियांना संघटित करून कुटुंब नियोजनाचे बीज पेरते आहे. तरीसुद्धा आजही स्त्रीच्या पावित्र्यासाठी तिला उकळत्या तेलात नवऱ्याने टाकलेले नाणे हाताने काढावे लागते आहे. आजही जातपंचायत अमानुषपणे लोकांना छळत आहे. काही मुले शिकत असली तरी सुद्धा जातीच्या दाखल्या अभावी पुन्हा वाममार्गाला लागत आहेत. पालातले घर आणि स्त्री जीवन यात अतिशय संत गतीने बदल होत आहे. या सगळ्याचे अनुभव सुनीताताईने अतिशय हृदयद्रावक पद्धतीने मांडले आहेत. काही छायाचित्रे सोबत जोडली आहेत. तिच्या सोबतीने चालणाऱ्यांची तिच्याबद्दलची मनोगत आहेत. नव्याने ओळख होणाऱ्या तिच्या समाजातील काही शब्दांची पेरणी आहे.तेंव्हा सुखासीन जगताना आपल्या जवळच असणाऱ्या एखाद्या भटक्या विमुक्त समाजाचे वास्तव जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला देखील हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.
सुनिताताईच्या जगण्याला, विचारांना, आत्मनिर्भयतेला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा…!

मनीषा पाटील
कणकवली

Leave A Reply

Your email address will not be published.