हिंदु राष्ट्राचं स्वप्न ! बोंबलू नको लेका गप्प न !

हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी सुरुवातीला संविधान बदलवायचं आहे. याचा अर्थ या देशाला जेव्हा संविधान लाभलं त्याच्या पूर्वीचा जो काळ होता तो म्हणजे मनूच्या कायद्याचं राष्ट्र. या भारत वर्षामध्ये दोन हजार वर्ष मनूच्याच कायदा राज्य होतं आणि पुन्हा या तथाकथित हिंदुराष्ट्र वाद्यांना संविधान पूर्व काळातील मनुच्या कायद्याने चालणारं मनू राज्य प्रस्थापित करायचं आहे. ज्याला त्यांनी हिंदुराष्ट्र हे गोड नाव दिलेलं आहे.

0 353

हिंदु राष्ट्राचं स्वप्न ! बोंबलू नको लेका गप्प न !

 

हेमंत टाले

मो. 9975807632

 

मित्रांनो हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या संदर्भात दोन गोष्टी सांगितल्या जात आहे. अलीकडेच अकोला येथे प्रदीप मिश्रा(अंधश्रद्धा शिरोमणी) नावाचा हिंदू राष्ट्राचा पुरस्कर्ता येऊन बोलून गेला की संविधान को बदलो हमको हिंदुराष्ट्र बनाना है अर्थात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यांना हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी सुरुवातीला संविधान बदलवायचं आहे. याचा अर्थ या देशाला जेव्हा संविधान लाभलं त्याच्या पूर्वीचा जो काळ होता तो म्हणजे मनूच्या कायद्याचं राष्ट्र. या भारत वर्षामध्ये दोन हजार वर्ष मनूच्याच कायदा राज्य होतं आणि पुन्हा या तथाकथित हिंदुराष्ट्र वाद्यांना संविधान पूर्व काळातील मनुच्या कायद्याने चालणारं मनू राज्य प्रस्थापित करायचं आहे. ज्याला त्यांनी हिंदुराष्ट्र हे गोड नाव दिलेलं आहे. इथल्या बहुसंख्य हिंदू बांधवांचं शोषण करून त्यांना गुलामीच्या खोल खड्ड्यात लोटून देणारं मनूराज्य आणण्यासाठी इथल्या बहुसंख्य हिंदू बांधवांना लिहिण्याचं बोलण्याचं, अभिव्यक्तीचं, स्वातंत्र्य देणारं संविधान बदलविणं क्रमप्राप्त आहे.म्हणून कधी नव्हे इतक्या उघडपणे ते संविधान बदलवून आम्हाला इथे तथाकथित हिंदुराष्ट्र निर्मीण करायच आहे असा जोरदार प्रचार प्रसार सुरू आहे.

आपल्याला माहीतच आहे की,गेली २००० वर्ष मनुच्या कायद्याने या देशातील बहुजन समाजाला लुळं पांगळं करून ठेवलेलं होतं. लकवा मारल्यासारखा हा सारा बहुजन समाज सुन्न पडलेला होता. जीभ असूनही तो बोलू शकत नव्हता. डोळे असूनही त्याला सत्याचे दर्शन होत नव्हतं. कान असूनही तो ज्ञान ग्रहण करू शकत नव्हता. याचं कारण म्हणजे ह्या सगळ्यांचं सारथ्य करणारा त्याचा मेंदू इथल्या मनुवादी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने गुलाम करून टाकला होता. तथाकथित हिंदूराष्ट्राचा अर्थ म्हणजे तुम्ही तुमची प्रतिभा वापरायची नाही. जो आपली प्रतिभा वापरत नाही तो मूर्तीमंत पशुच होय. *माणसाने बुद्धी वापरावी| रूपांतरे व्यवहारी आणावी| बिघडली घडी दुरुस्त करावी| समाजाची* ग्रामगीता| राष्ट्रसंतासहित आमच्या सगळ्या संतांनी आणि सुधारकांनी सर्वसामान्य जनतेचा विवेक म्हणजेच त्यांची बुद्धी जागृत करण्याचे अत्यंत महत्त्वाचं प्रबोधनाचं काम केलेलं आहे.

गेल्या दहा लाख वर्षाचा माणसाचा प्रवास हा थक्क करणारा आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणसाला लाभलेली प्रतिभा त्याचा मेंदू हे निसर्गाने दिलेलं त्याला सगळ्यात मोठे वरदान. याच प्रगत मेंदूच्या आधारावर गेल्या शंभर वर्षांमध्ये माणसाने प्रगतीचं सर्वोच्च शिखर गाठलेलं आपण पाहतो. मग ९लाख ९९हजार ९०० वर्ष एवढ्या प्रचंड मोठ्या काळामध्ये जी प्रगती आपण करू शकलो नाही ती प्रगती आपण अवघ्या शंभर वर्षांमध्ये करुन दाखवली याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अर्थात चिकित्सा करण्याची आणि सुधारणा घडवून आणण्याची मनोवृत्ती आपण विकसित केली पाहिजे हा होय.

ही चिकित्सा करण्याची अर्थात सुधारणा घडवून आणण्याची मनोवृत्ती जी आपल्या संविधानाची देण आहे आणि म्हणून जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत या देशात या हिंदू राष्ट्रवाद्यांना हवं असलेलं मनुच्या कायद्याचं हिंदुराष्ट्र कधीही आणता येणार नाही. मनू चा कायदा आपल्याला काय सांगतो *संशयात्मे विनाशती* अर्थात संशय घ्याल तर नरकात जाल. कुठल्याही स्थितीत चिकित्सा करायची नाही. म्हणजे आपण आपली प्रतिभा आपली बुद्धी आपला मेंदू वापरायचा नाही. मेंदूला गुलाम करून टाकणारे धर्मग्रंथातील हे कायदे इथल्या बहुजन समाजाला एकच सांगत होते आणि तो मंत्र होता गप्प बसा म्हणून हा सारा बहुजन समाज २००० वर्ष आंधळा मुका आणि बहिरा होता. त्याला कुठल्याही संवेदना नव्हत्या.

मनूचा कायदा हा विषमता मुलक आहे आणि म्हणून स्त्रियांनी केलेली प्रगती या मनुवाद्यांच्या डोळ्यांमध्ये सलत आहे. खूपत आहे. ती त्यांना स्वस्त बसू देत नाही. नवरा मेला की तिने जिवंतपणी चितेवर लेटून स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करत तडफडत तडफडत मरण पत्करणे आणि स्वतःची राख करून घेऊन आपलं अस्तित्व संपवून सतीची झुल पांगरण्यातच तुझा धर्म आहे असं सांगणारा आणि पत्नी मेल्यानंतर तिची राख थंडी होत नाही तोच पतीने दुसरे लग्न करण्याची मुभा देणारा विषमता मुलक ब्राह्मणी धर्म हा हिंदू धर्म असू शकतो का ? असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या हावरट लिंग पिसाट मनुवादी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने तयार केलेला बहुपत्नीकत्वाचा कायदा रद्द करून एक पत्नीकत्वाचा कायदा केला आणि भारतातल्या संबंध स्त्रियांना आश्वासक संरक्षण दिले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पतीच्या संपत्तीत आणि पित्याच्या संपत्तीमध्ये वाटा मिळवून दिला. भारतातील 50% लोकसंख्या असणाऱ्या स्त्रियांना संरक्षण देणारं संविधान यांना का बदलवायचं आहे? या स्त्रिया हिंदू नाही का? आणि म्हणून हिंदू हा शब्द बहुसंख्य लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी वापरल्या जात आहे. खऱ्या अर्थाने त्यांना बहुसंख्य हिंदूंचं कल्याणकारी राज्य निर्माण करायचं नसून मुठभर चंगळवादी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचं मूलक असणारं मनूच्या कायद्याचं राज्य आणायचं आहे. आणि त्याला त्यांनी हिंदू राष्ट्र हे गोड नाव दिलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे.

भारत देशामध्ये जर हिंदूराष्ट्र आणायचं असेल तर बिनडोक भक्तांची फौज निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तसेंच गुलाम प्रिंट आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे काम अत्यंत जोरात सुरू आहे. हे बिनडोक भक्त आपल्या अनुभवाचे एकही अक्षर शेअर न करता आयटी सेलने निर्माण केलेले मेसेज फॉरवर्ड करण्यातच स्वतःला धन्य समजणारे स्वतःची बुद्धी न वापरण्यात धन्यता मानणारे आणि त्यातच स्वाभिमान बाळगणारे असुन अशा लोकांनी बनलेला समाजच खऱ्या अर्थाने गुलामांचा देश असतो माझ्याकडे एक अंधभक्त आला आणि मला काहीही न विचारता काहीही ऐकून न घेता बोलत राहिला. शेतकऱ्याचे प्रश्न संपणारे नाही. शेतमालाला कधीही भाव मिळणार नाही. सरकारी अधिकारी काम करत नाही म्हणून पूर्ण खाजगीकरण झालं पाहिजे. पेट्रोल पाचशे रुपये लिटर असायला पाहिजे. कारण आपल्याला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्यासाठी पडेल ते कष्ट आणि होईल तेवढा त्याग आपण केला पाहिजे. प्रसंगी मुरमुरे खाऊन राहायची वेळ आली तरी चालेल. एवढेच काय तर जगताच येत नसेल तर मंगळावर राहायला जा. याच पद्धतीने धर्मपंडित बहुसंख्य हिंदू बांधवांना सांगायचे. या जन्मामध्ये असणाऱ्या दुःखाचं कारण मागच्या जन्मात केलेलं पाप आहे. म्हणून वाट्याला आलेलं दुःख निमुटपणे सहन करणे हा तुमचा धर्म जर तुम्ही पाळला तर पुढच्या जन्मात तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. म्हणजे वास्तविक जीवनात सुखी होण्याचे सगळे दरवाजे या मनुवादी धर्मपंडितांनी बंद केले होते. पारलौकिक सुखाचं म्हणजे मोक्षाचे स्वप्न दाखवून त्याला गप्प केलं होतं. आज ज्या जनतेच्या समस्या आहेत महागाई, बेरोजगारी याला जबाबदार आमचे आजचे राज्यकर्ते आहे. एक लोक कल्याणकारी राज्य निर्मिती करण्यासाठी ते सपशेल अपयशी ठरलेले आहे. त्यासाठी लागणारे कर्तृत्व आणि नैतिकता त्यांच्याकडे नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी वरील समस्येविषयी ब्र ही न काढणारा समाज त्यांना हवा आहे आणि त्यासाठी त्यांनी त्याला दाखवलेलं आहे , हिंदू राष्ट्राचे स्वप्न ! अर्थात बोंबलू नको लेका गप्प न !

Leave A Reply

Your email address will not be published.