भाजपला साथ देण्यासाठी बंडखोरी केली ही घोडचूक : आ. बच्चू कडू

0 90

भाजपला साथ देण्यासाठी बंडखोरी केली ही घोडचूक : आ. बच्चू कडू

 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस काम करू देत नाही म्हणून भाजपला साथ देण्यासाठी कंटाळून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो होतो, पण आता त्यांनीच राष्ट्रवादीला जवळ केले. बंडखोरी करून शिंदेबरोबर गेलो हीच घोडचूक झाली, अशी भावना एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांची झाली असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. अपेक्षेपेक्षा जास्तच मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती. शिंदे गटाबरोबर जाऊन मात्र निराशाच पदरी पडल्याचे त्यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले. मंत्रीपदाचे आमिष दाखवून त्यांना शिंदे गटाने स्वत:कडे बोलवून घेतले होते. परंतु मंत्रीपद त्यांना मिळालेच नाही असे विचारले असता, वाटून टाकायला मंत्रीपद काय भाजीपाला आहे का आणि आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे. एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून आपण भाजपला पाठिंबा दिला होता. आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील, आमच्या निर्णयात आडवे येतील अशी त्यांना भीती आहे. त्याचबरोबर आम्ही सरकारमधील घटक पक्ष असूनही राष्ट्रवादीला सोबत घेण्याआधी आमच्याबरोबर किमान चर्चा तरी करायला हवी होती, असा संतापही ते व्यक्त करत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.