‘कोणता झेंडा घेऊ हाती !’

0 17
कोणता झेंडा घेऊ हाती !’
फक्त शिवाजी हे नाव जरी उच्चारले तरी तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते असे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे त्यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात. तसेच त्यांचे चिरंजीव व नातू हे त्या ‘शिवराय’ या नावाचा वापर करून स्वत:चे खिस्से गरम करून राजकीय पोळी भाजताना दिसतात तेव्हा त्यांना पोळीसेना म्हणावे का ? असे वाटते. पण छ. शिवरायांची बदनामी होते त्यावेळी हेच पोळीसेना व त्यांचे भक्त करत तरी असतील काय ? कारण या पोळीसेनेला विनायक सावरकराचा कोणी अवमान केला तर राग येतोय पण ज्यांच पोटच शिवरायांच्या नावावर चालतं ते शिवरायाविषयी येवढे झोपलेले का ? हे आमच्या बहुजन समाजाने समजून घेणे काळाची गरजेचे आहे.
मराठीत एक म्हण आहे की, ‘नाकं दाबलं की तोंड उघडतं’ पण यावर्षी ही म्हण चक्क खोटी ठरली कारण काल परवा देशात व महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत खरे पणाचे व पुरोगामीत्वाचे सोंग ढोंग करून ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणणा-या राज ठाकरेंच्या समोर ‘इडी’ आली अन् तोंड बंद झालं. तोंड बंद होताच त्यांची अवस्था ‘घर का ना घाट का ?’ अशी झाली हे सर्वांनी पाहीलं आहेच. पण त्यांनी स्वत:च्या तोंडाप्रमाणे राजकीय पक्षाच्या ध्वजावरील इंजिनाचे (तोंडही) चिन्हाची दिशा बदलून बघितले पण नुसते सरड्यासारखे रंग बदलणे तसेच इकडचे तोंड तिकडे केले म्हणजे कोणीतरी जवळ करेल असं त्यांना वाटलं असेल पण तेही फोल ठरलं. त्यामुळे त्यांनी आता चक्क स्वत:च्या पक्षाचा ध्वज आणि ध्वजाचा रंग बदलून त्या ध्वजावर छ. शिवरायांची राजमुद्रा प्रकाशित करणार आहेत, तेव्हा त्या राज ठाकरेंना काही प्रश्न करावेसे वाटतात की, जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी बाबा पुरंदरेंचा उदो उदो करणारांना शिवरायांची राजमुद्रा लागते कशाला ? त्याऐवजी राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षाचा ध्वज बाबा पुरंदरे यांचा पंचासारखा करून त्यावर पुरंदरेंची प्रतिमा अथवा एखादे घोषवाक्य प्रकाशित करायला काय कोणाची हारकत आहे का ?
म्हणजेच जे लोक राजकारणात अयशस्वी होतात ते सैरावैरा होतात हे काही नवीन नाही. सध्यातरी राज ठाकरेंची अवस्था म्हणजे ‘कोणता झेंडा घेऊ हाती !’ अशीच म्हणावी का ? याविषयी कवी प्रशांत वामन भोयबार म्हणतात की,
‘एक अस्थिर सैरावैरा राजकारणी आहे मी
सध्या तरी बिकट झाली माझी परिस्थिती
आधीच्या झेंड्यावर मनं माझं स्थिर राहत नाही
आता तुम्हीच सांगा ना ‘कोणता झेंडा घेऊ हाती ? मी’
राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ओसरता प्रभाव आणि शिवसेनेला मात देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलण्याची तयारी करत असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने प्रसिध्द केली होती. मनसेच्या झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार आहे सध्याच्या मनसेच्या झेंड्याचा रंग निळा, भगवा आणि हिरवा आहे. २३ जानेवारी २०२० रोजी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार असून, या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याच्या तयार करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठीच झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. कारण जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला गेला होता असेच म्हणावे का ? परंतु कार्य नसताना केवळ रंगाच्या नावावर त्यांना यश मिळवता येते का ?. राजकारणात चढउतार होत असतात. परंतू आज स्वत:च्या स्वार्थासाठी लोकांची मतं मिळवण्यासाठी धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुध्दा सरड्यासारखे सतत बदलला जातोय तेव्हा बहुजन समाजातील तरुणांनी अशा रंगबदलू अन् झेंडे बदलू लोकांना मतपेटीतून धडा शिकवणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र विरोध होताना दिसत आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता नवीन भगवाझेंडा निर्माण करून त्यावर ‘राजमुद्रा’ छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचे साधन नाही. छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केली होती. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये. म्हणून मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर स्वागत करू…! आम्ही भारतीय संविधान व लोकशाही मानणारे व्यक्ती आहोत. परंतु ‘राजमुद्रा’ वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता, समता आणि बंधुतेचा प्रतीक असून तथागत बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतीक आहे. तेच त्यांनी स्वीकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालंर पांघरु नये. पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले ..? आता या जातीच्या रंगाचा मनसे करणार काय…? हा प्रश्न महाराष्ट्र समोर पडलेला आहे. तसेच देशाचे व राज्याचे निवडणूक आयोग छत्रपती यांचे वंशज व महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्या विरोधात व झेंड्या वरील राजमुद्रे विरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार करणार आहे. ‘राजमुद्रा’ ही
राज्यकारभाराची निशाणी आहे. ती मनसेला झेंड्यावर वापरता येणार नाही अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. यासाठी मनसे विरोधात संभाजी ब्रिगेड भविष्यात तीव्र संघर्ष करणार आहे असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात छ. शिवाजी महाराज यांचा इतिहास वगळला तेव्हा हेच राज ठाकरे कुठं आणि काय करत होते ?, तसेच इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमातील संस्कृत सारिका या पुस्तकात राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बदनामीकारक लिखाण एका मनुवादी विकृतीने केले तेव्हा या मनमानी सेनेच्या प्रमुखांनी निषेध व्यक्त केला होता का ?
तसेच पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, जगतगुरू तुकोबाराय यांची बदनामी करणारे लेखन असलेली पुस्तके जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थींना वाटण्यात आली होती त्यांचा संभाजी ब्रिगेडने निषेध व तीव्र विरोध करून अवमानकारक लिखाण असलेली पुस्तकं परत घेण्यास भाग पाडले तेव्हा मनमानी सेनाप्रमुख नेमकं करत तरी काय होते ? तेव्हा त्यांना छत्रपती शिवराय आठवले नाहीत का ?.
आमच्या बहुजन समाजाला असे राजकीय लोक वेगवेगळ्या धर्माच्या तसेच रंगाच्या रंगाने रंगवून स्वत:चा स्वार्थ साधतील पण बहुजनातील तरुणांनी त्या राजकीय ‘रंगोटीवीरांनी’ समाजासाठी कार्य केले ? तसेच त्या वीरांच्या वाणीत आणि करणीत बहुजन महापुरूषांचे विचार आहेत का ? हे तपासून आपले अमुल्य असे मत दिले तरच त्यांना धडा बसेल. तेव्हाच  रंगोटीवीरांना वाटेल की, ‘कोणता झेंडा घेऊ हाती
तरीही लोक मत देतच आमच्यासाठी’
असे झाल्यास खरे महापुरुषांच्या विचारांचे राज्य येईल अन्यथा झेंडा अन् दांडा गोतास काळ होईल.
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२
Leave A Reply

Your email address will not be published.