गुणवंत विद्यार्थी नंतर असे का वागतात ?

0 91

गुणवंत विद्यार्थी नंतर असे का वागतात ?

 

✍🏻 प्रेमकुमार बोके

अंजनगाव सुर्जी

भारत ही गुणवंत,ज्ञानवंत,प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची खाण आहे.दरवर्षी दहावी,बारावी आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी अतिशय चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण होतात. मागील काही वर्षात दहावी आणि बारावीत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण सुद्धा मिळालेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता विकसित होत आहे असे त्यांना मिळालेल्या गुणांवरून दिसून येते. ही हुशार आणि क्रीम मुले त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असते.त्याचबरोबर समाज म्हणून आपणा सर्वांसाठी सुद्धा ही गुणवंत मुलेमुली निश्चितच गौरवाची बाब असते.या मुलांपासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य प्राप्त करतात. त्यामुळे दरवर्षी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी म्हणजे पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत असतो. त्यामुळे ही सर्व हुशार मुलेमुली देशाचे भवितव्य आणि आधारस्तंभ असतो.देशाला या सर्व हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर गर्व असतो.कारण पुढे देशाला चालविण्याची जबाबदारी याच हुशार मुलांवर असते.

हे हुशार विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर नंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठमोठया पदांवर काम करायला लागतात.कोणी डॉक्टर होतो, कोणी इंजिनियर,कोणी कलेक्टर, कमिशनर,तहसीलदार,बिडिओ,एसडीओ,सीओ,सीईओ,पोलिस अधिकारी,कृषी अधिकारी,बँक अधिकारी,संशोधक अशा असंख्य क्षेत्रांमध्ये हे हुशार विद्यार्थी नंतर काम करायला लागतात.यातील अनेक क्षेत्रे ही सार्वजनिक असतात.या क्षेत्रातील या हुशार लोकांचा किंवा अधिकाऱ्यांचा लोकांसोबत दररोज संपर्क येतो.आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर क्लास वन,क्लास टू अधिकारी बनलेल्या या गुणवंतांना दररोज शेकडो लोक भेटत असतात.या अधिकाऱ्यांनी आपली कामे करावी, आपल्याला न्याय द्यावा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आणि अपेक्षा असते.काही अधिकारी निश्चितपणे आपले कर्तव्य अत्यंत इमानदारीने पार पाडतात.आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना मनात ठेवून आपल्याकडे आलेल्या लोकांना योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न ही उच्च पदावर असलेली अधिकारी मंडळी करीत असतात. त्यामुळे जनतेला सुद्धा आपले काम लवकरात लवकर झाले याचे समाधान मिळत असते व या अधिकाऱ्यांबद्दल लोक बाहेर चांगले बोलत असतात.

परंतु अतिशय प्रामाणिकतेने आपले कर्तव्य पार पाडणारी अशा प्रकारची उच्च पदावर विराजमान झालेली अधिकारी मंडळी ही फार कमी आहेत.त्यांच्याप्रमाणेच आपल्या पेशासोबत प्रामाणिक असणारी जर सगळीच माणसे असती तर निश्चितपणे आज आपल्या देशाचे चित्र फार वेगळे राहिले असते. प्रत्येक वेळी आपण राजकीय लोकांना दोष देऊन,शिव्या देऊन,त्यांच्यावर टीका करून मोकळे होतो. परंतु राजकीय लोकांपेक्षा सुद्धा मोठमोठ्या पदावर विराजमान असलेली ही अधिकारी मंडळी मात्र खूपच निगरगट्ट आणि निष्ठूर आहेत. सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी आपली नियुक्ती झालेली आहे ही गोष्टच ही मंडळी पूर्णतः विसरून गेलेली असते.आपल्या उच्च पदाचा या लोकांना प्रचंड अहंकार झालेला असतो आणि आपले पद हे सर्वसामान्य माणसांवर अधिकार आणि हुकूमत गाजवण्यासाठी निर्माण झालेले आहे अशीच बहुतांश अधिकाऱ्यांची भावना झालेली असते. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या विषयी सर्वसामान्य माणसांच्या मनात प्रचंड राग आणि घृणा निर्माण झालेली असते.अशा अहंकारी, उद्धट आणि कामचुकार अधिकाऱ्यांमुळे, जे प्रामाणिक आणि कर्तव्यशील अधिकारी असतात त्यांच्याकडेही लोक चुकीच्या दृष्टीने पाहतात.चांगल्या अधिकाऱ्यांचे नुकसान अशा भ्रष्ट लोकांमुळे होते.

एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा मोठा कृषी अधिकारी होतो. ही गोष्ट त्या शेतकऱ्यासाठी आणि समस्त शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची असते.परंतु अधिकारी बनल्यानंतर हा शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्यांचे दुःख,वेदना,व्यथा,अडचणी,समस्या पार विसरून जातो.एखादा शेतकरी त्याच्याकडे आपली कैफियत घेऊन गेल्यानंतर हा अधिकारी त्या शेतकऱ्याला त्रास देतो आणि त्याच्याकडून लाच मागतो ही गोष्ट अत्यंत लज्जास्पद असून शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यालाच फसविणे याच्यापेक्षा दुसरा कोणताही मोठा गुन्हा असू शकत नाही. एखादा गरिबाचा मुलगा डॉक्टर बनतो. त्या भागातल्या सर्वांना आनंद होतो. परंतु डॉक्टर बनल्यानंतर जर तो मुलगा निव्वळ पैसा हेच सर्वस्व मानून आणि एखाद्या गरीबाला कधीही सहकार्य न करता त्याच्याकडूनही भरमसाट पैशाची अपेक्षा करीत असेल तर त्याची बुद्धिमत्ता ही समाजाच्या कामाची नसते.त्याचप्रमाणे सामान्य कुटुंबातून आलेली हुशार मुले पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी,बँक अधिकारी किंवा वेगवेगळ्या खात्यातील मोठमोठ्या हुद्यांवर पोहोचल्यानंतर जर सामान्य लोकांना त्रास देत असतील, त्यांच्याकडून पैसे मागत असतील, वेळेवर त्यांची कामे करत नसतील तर ही गुणवंत मुले म्हणजे केवळ पैसे कमावण्यासाठी निर्माण झालेली लुटारूंची टोळी आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

त्यामुळे अशा प्रज्ञावंत, ज्ञानवंत, गुणवंत विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळातच सामाजिक जाण आणि भान याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ त्यांच्या नोकरी संदर्भातील प्रशिक्षण देऊन चालणार नाही तर आपण या समाजाचे घटक आहोत,या समाजाचा गाडा व्यवस्थित चालविण्यासाठी आपली नियुक्ती झालेली आहे,आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या भरवशावर माझं कुटुंब चालते आणि त्यामुळे त्याचे काम पैसे न घेता स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य समजून मी वेळेत केलेच पाहिजे ही भावना सुरुवातीच्या काळातच या तरुण हुशार विद्यार्थ्यांच्या डोक्यात बिंबविणे अत्यंत गरजेचे आहे.तरच भारत महासत्ता होऊ शकतो.अन्यथा आपण पाहतच आहोत की,या देशात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे अनेक मोठमोठे अधिकारी दररोज पकडल्या जातात आणि नंतर स्वतःच्या इज्जतीचा पालापाचोळा करून घेतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी आपल्या देशाचा विचार करणे अगत्याचे आहे. तरच त्यांनी लहानपणी प्राप्त केलेली गुणवत्ता ही खऱ्या अर्थाने चांगल्या संस्काराने प्राप्त केलेली गुणवत्ता होती असे म्हणता येईल.अन्यथा एखादा कमी गुण मिळवून अधिकारी झालेला विद्यार्थी जर खऱ्या अर्थाने समाजाची जाण ठेवून आपले कर्तव्य बजावत असेल तर मेरिटमध्ये आलेल्या हुशार विद्यार्थ्यांपेक्षा हा सर्वसाधारण विद्यार्थी देशाच्या कामाचा व सुसंस्कारी आहे आणि अशाच प्रामाणिक विद्यार्थ्यांमुळे देश प्रगतीपथावर जाऊ शकतो असे आपणास म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.