द केरळ स्टोरी VS रिअल स्टोरी…

1 1,911

द केरळ स्टोरी VS रिअल स्टोरी…

 

विनोद पंजाबराव सरावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता मेहकर
मोबा:९१३०९७९३००

 

द केरळ स्टोरी या चित्रपटावरून अनेक वादविवाद निर्माण झालेले आहेत. तर हिंदू संघटना व कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी या चित्रपटाचा संबंध धर्माशी जोडून याला अंतिम सत्य समजले आहे. म्हणून धर्मातील महिला सुरक्षित नाहीत असा तर्क बांधल्या जात आहे. मुळात भारतीय लोक कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता धर्माच्या नावाखाली लवकर भावनिक होतात. त्यातही विशेष म्हणजे भारतीय लोक तेव्हाच धार्मिक होतात जेव्हा राजकारणी लोक धर्माला मुद्दा बनवतात. एरवी धर्माबाबतही भारतीय लोक पाहिजे तेवढे जागृत नाहीत. हे अनेक बाबीमधून सिद्ध झालेली आहे. म्हणजेच आजच्या लोकांना धर्म केवळ राजकीय नेत्यांकडून अपेक्षित आहे. आणि राजकीय नेते राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माचा वापर करून समाजामध्ये द्वेष व मत्सर पसरवून स्वतःची वोट बँक तयार करून ठेवतात. सध्याचे राजकारण एवढे घाण व गलिच्छ झालेले आहे की, राजकीय नेत्यांना, धार्मिक राजकीय पक्षांना, समाजाचे व धर्माचे काहीही घेणेदेणे नाही. ते केवळ सोयीनुसार धर्माचा वापर करून लोकांना भावनिक बनवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. परंतु लोकांनी जागृत राहणे व आपले हिताच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या बघणे आवश्यक आहे. कारण राजकीय नेते स्वतःच्या हिताचा विचार करतात जनतेचा नाही. म्हणून किमान जनतेने तरी स्वतःचा विचार करून आपली ऊर्जा व आपली बुद्धिमत्ता कुठे आणि कशी खर्च करायची हे ठरवणे आवश्यक आहे. आता आपण केरळ स्टोरी या चित्रपटाचा जर विचार केला तर हा एक चित्रपट आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक सूचना दिली जात असते या चित्रपटाच्या सुरुवातीला सुद्धां सूचना दिलेली आहे. त्यामध्ये असे स्पष्ट लिहिलेले आहे ही कथा व पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही घटनेची व व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जर काही संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा. म्हणजे द केरळ स्टोरी हा चित्रपट धार्मिक जनजागृतीसाठी नव्हे तर कमाई करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. चित्रपट निर्माता त्या चित्रपटावर पैसे कमवतो आणि आम्ही मात्र हिंदू मुस्लिम भेद करून बुद्धी व माणुसकी गमावतो. हे कितपत योग्य आहे, हे स्वतः ठरवणे आवश्यक आहे. याचा अर्थ आपण चुकीच्या गोष्टीला समर्थन करतो असे मुळीच नाही. सदर चित्रपट संदर्भात सुदीप्तो सेन व अभिनेत्री अदा शर्मा यांनी वाहिनीला दिलेली मुलाखत बघितली. त्यामध्ये सुदीप्तो सेन यांचे म्हणणे असे आहे, तीन मुलीच्या केस स्टडी वरून हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. तर अदा शर्मा यांच्या मतानुसार संख्या न बघता त्यामधले महिला बेपत्ता होतात हा भाग बघणे आवश्यक आहे. आणि खरंच संख्या न बघता महिला बेपत्ता होणे हा भाग बघितलाच गेला पाहिजेत, तरच आपण महिलांना न्याय देऊ शकतो. मग निर्मात्याच्या मते तीन महिलांची केस स्टडी करून हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे, तर ज्या पद्धतीने तीन महिला आहेत ज्यांना चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करून संघटनेमध्ये सामील करून घेण्यात आले. याचे समर्थन कोणीच करणार नाही, ते चुकीचेच आहे. अदा शर्मा यांच्या मतानुसार आपण जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या मुलींची संख्या न बघता घटना बघावी ही घटना चिंताजनक आहे. तर ही गोष्ट योग्य व रीतसर आहे. कोणत्याही धर्माने कोणत्याही धर्मावर अन्याय अत्याचार करून कोणतेही कृत्य करू नये, हाच मानव धर्म होय. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे तीन महिलांचे धर्मांतर जबरदस्तीने झाले म्हणजे त्या महिलांवर ती अन्याय अत्याचार झाला, हा अन्य अत्याचार होऊ नये, या हिंदू महिला होत्या म्हणून संपूर्ण भारतभर या चित्रपटाची जाहिरात करून व चित्रपट बघून हिंदू स्त्रिया धोक्यात आहेत हे दाखवून देताना, निर्मात्याला मात्र आपण करोडो रुपये कमावून दिले. ही बाब विसरून जातो सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे तीन महिलांवर आम्ही अन्याय अत्याचार सहन करू शकत नाही. आणि तो सहन करू ही नाही. मग गुजरात मधून गेल्या पाच वर्षांमध्ये 41 हजार 621 महिला गायब झाल्यात, हा आकडा शासकीय आहे. ती केस स्टडी नाहीये काल्पनिक गोष्ट नाहीये, तरी सत्य परिस्थिती आहे. एकट्या गुजरातमध्ये जर 41 हजार 621 महिला गायक होतात, तेव्हा महिलांना न्याय मिळावा म्हणून, महिला धोक्यात आहेत म्हणून, सरकारला प्रश्न विचारणे,धारेवर धरणे, योग्य नाही का? मग 41 हजार 621 महिला गायब झालेले असतानाही आम्ही वाद निर्माण करतो फक्त तीन महिलांविषयी .आणि तेही चित्रपटाच्या दृष्टिकोनातून. परंतु मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितले तर 41,621 महिलां बाबत प्रधानमंत्री गृहमंत्री व गुजरातचे मुख्यमंत्री यांना आपण प्रश्न विचारून ज्या पद्धतीने केलं द केरळ फाईल बघून आपण मुस्लिमांना टार्गेट करत आहोत, असेच टार्गेट प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांना करणार आहोत का? जर आम्ही 41 हजार 621 महिलांच्या न्यायासाठी प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, यांना प्रश्न विचारला नाही तर याचाच अर्थ आम्ही केवळ हिंदू मुस्लिम मुद्द्यावरच भडकतो. एरवी आमच्या धर्मावर किंवा धर्मातील महिलांवर कितीही अन्याय अत्याचार झाला तर आम्ही त्यावर बोलणार नाही, कारण हिंदुत्व हे राजकारणी लोकांनी सांगितल्यानंतरच स्वीकारायचे असते, असा समज सर्वसामान्य लोकांचा होऊन, राजकीय नेत्यांचे भक्त झाल्याचे दिसते. गुजरात प्रमाणे महाराष्ट्रामध्ये मागील तीन महिन्यात पाच हाजारापेक्षा जास्त महिला बेपत्ता आहेत, याबाबत सरकारला आपण प्रश्न विचारात नाही, याचा अर्थ महिला बेपत्ता होण्याला, महिलांवर अत्याचार होण्याला, लोकांचा विरोध मुळीच नाही. लोक महिला बेपत्ता होण्याबाबत मुळीच चिंतेत नाहीत. लोक चिंतेत आहेत ते फक्त मुसलमाना बाबत. केवळ एखादे चुकिचे कृत्य मुस्लिमांनी केले म्हणून विरोध करायचा हे मात्र चुकीचे आहे. चुकीच्या कृत्याला विरोध करणे हे मानवतेचे लक्षण आहे. चुकीचे कृत्य कोणी केले? त्याची जात आणि धर्म बघून विरोध करणे हे गुलामीचे लक्षण आहे. महाराष्ट्र मध्ये तीन महिन्यात पाच हजारांपेक्षा जास्त महिला गायब झाल्यात याची माहिती सर्वसामान्य लोकांना जर नसेल किंवा माहिती असूनही लोक जर या महिलांच्या सन्मानासाठी, किंवा न्यायाण्यासाठी रस्त्यावर उतरत नसतील, तर यांना नेमका धर्म म्हनायचे? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणत्याही वाईट कृत्याला धर्माची जोडने योग्य नाही. कोणत्याही वाईट कृत्याला धर्म नसतो, गुन्हा हा गुन्हा असतो. तर गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जाती धर्मामध्ये बंदिस्त करून गुन्ह्याचे तीव्रता कमी करता येणार नाही. म्हणून केरळ फाईल विरोधात आवाज उठवणारे लोक, केरळ फाईल बघून हिंदू महिला धोक्यात आहेत असे मत निर्माण करणारी लोक गुजरातमधील 41 हजार महिला व महाराष्ट्रातील पाच हजार महिला यांबाबत कधी बोलणार? जसं द केरळ फाईल चित्रपट बघून लोक मुस्लिमांना टार्गेट करत आहेत, तसेच गुजरात मधील व महाराष्ट्र मधील आकडा बघून सरकारला कधी टार्गेट करणार? की सरकार मुस्लिमांचे नसल्यामुळे सरकारला टार्गेट न करता सरकारची बाजू योग्य आहे असे समजणार? लोकांनी राजकीय नेत्यांचे ऐकून आपले धार्मिक मत कधीही बनवू नये. यामुळे सर्वसामान्य लोकांचेच नुकसान आहे. खरंच सरकारला हिंदू महिलांचे संरक्षण करून न्याय द्यायचा आहे आणि लोकांना हिंदू महिलांच्या संरक्षणासाठी सक्षमपणे उभे राहायचे आहे, तर दिल्ली या ठिकाणी अनेक दिवसांपासून महिला कुस्ती खेळाडू लैंगिक शोषणाच्या आरोप करून उपोषण करत आहेत. त्या ठिकाणी महिला खेळाडू यांनी ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेत, त्या व्यक्तीला संरक्षण तर महिला खेळाडूंवर कारवाई करण्यात येत आहे. ही बाब धर्माला मान्य आहे,? हा प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. सत्ताधारी खासदार असल्याने किंवा मुसलमान नसल्याने त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. असेच दिसून येतील याच जाग्यावर जर चुकून मुसलमान असता तर मात्र संपूर्ण देश पेटला असता, जनतेने राजकीय नेत्याना अगोदर स्वतःचा विचार करावा ४१ हजार महिला गायब झाल्यात, उद्या आपल्या घरातील महिला बेपत्ता होऊ शकते, आज महिला कुस्ती खेळाडू न्याय मागत आहेत, उद्या आपल्याही घरातील महिला न्यायासाठी रस्त्यावर येऊ शकते. जर आज सरकारची अशी भूमिका असेल, महिलांना न्याय मिळेल किंवा खरंच आपण न्यायासाठी धर्माचा वापर करतो की अन्यायासाठी धर्माचा वापर करतो ,द्वेष मत्सर पसरवण्यासाठी धर्माचा वापर करणे चुकीचे आहे .म्हणून द केरळ स्टोरी चित्रपटाला चित्रपट म्हणून नक्की बघावे. परंतु महिलांची रियल स्टोरीची सुद्धा जाणीव असावी तरच आपल्या मधला माणूस जिवंत आहे हे दिसून येईल.

1 Comment
  1. Laxman Narayan Ahire says

    सत्य हे कधीच लपत नाही, परंतु म्हणतात ना सत्याचा विजय हमखास आहे.जय रविदास,जय शिवराय जय भीम,जय महाराष्ट्र…..

Leave A Reply

Your email address will not be published.