मी आरएसएस का सोडलं ?

2 2,250

मी आरएसएस का सोडलं ?

 

लेखक
सुदर्शन चखाले
सहसचिव , युवक क्रांती दल,पुणे शहर
7887630615

 

लहानपणी माझी जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झाली. पुण्यातील येरवडा भागातील गजबजलेल्या वस्तीत मी लहानाचा मोठा झालो. तिथली झोपडपट्टी अनेक कारणांसाठी प्रसिध्द आहे. वस्तीत अर्थातच खेळायला मैदान नावाची गोष्ट नाही. हर्ष हा मुंबईचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आमच्या वस्तीत नव्याने राहायला आला होता. तो आम्हाला संघशाखेवर खेळायला घेऊन जायचा. खेळण्याच्या निमित्ताने शाखेची गोडी वाटू लागली. मला मैदानी खेळ आवडतात. त्यामूळे पाचवी – सहावीपासून सुरू झालेली संघशाखेतली हजेरी २०१४-१५ पर्यंत टिकली.
हळूहळू मी शाखेबरोबरच इतर संघकार्यातही जास्त वेळ देऊ लागलो. माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर ‘मुख्य शिक्षक’ ही जबाबदारी टाकली. मुख्य शिक्षक हा शाखेचा प्रमुख असतो. दैनंदिन शाखा लावणे, संघटन बांधणी आणि विचारांचा प्रचार – प्रसार ह्या त्याच्या मुख्य जबाबदा-या असतात. येरवड्यातील यशवंतनगर या माझ्या वस्तीतील मुलांना संघटीत करून त्यांचे खेळ घेणे, गाणे शिकवणे ही कामे मी सुरू केली. नियमित शाखेत येणारा एखादा स्वयंसेवक गैरहजर राहीला, तर त्याची मी चौकशी करायचो. शाखेत आला नसेल तर त्याच्या घरी जाणे, त्याच्याशी गप्पा मारणे, मैत्री करणे आणि त्याच्या कुटुंबियांना मानसिक दृष्ट्या तयार करणे, संघ शाखेत पाठवणे अशी कामे चालू असायची.
मी पुढाकार घेत असल्याचे संघातील वरिष्ठांच्या लक्षात आले होतेच. जनसंपर्क, संघटन बांधणी, संवाद , भेटीगाठी हे माझे आवडीचे काम असल्याने मी संघकार्यात जास्त सक्रिय झालो. म्हणून मला माझ्या वरिष्ठांनी सात दिवसाच्या शिबिराला पाठवलं. त्याला आरेसेसच्या भाषेत ‘प्राथमिक शिक्षा वर्ग’ असे म्हणतात. दैनंदिन शाखेच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचाराचा प्रसार – प्रचार करण्याची कौशल्ये त्यात शिकवली जातात. माझं हे शिबिर पुण्यातील रमणबाग येथील न्यु इंग्लिश शाळेत झालं. तेव्हा मी दहावीची परीक्षा पास झालो होतो.
या सगळ्या वातावरणात मी कट्टर हिंदुत्ववादी होत गेलो. त्यामूळे मी मुस्लिमविरोधी बनत गेलो. मला दाढीवाला आणि टोपीवाला माणूस देशद्रोही वाटू लागला. मनात प्रचंड द्वेष आणि राग धुमसायला लागला. त्याची कारणं मात्र कळत नव्हती. या माझ्या भुमिकेबद्दल , वागण्याबद्दल मला आजही दुःख आणि खंत वाटते .
संघाच्या अनेक बैठकांना मी जाऊ लागलो. त्यामध्ये खोटी देशभक्ती आम्हाला शिकवली गेली. या बैठकीत आम्हाला सांगितले जायचे, की आपल्याला राष्ट्रकार्य करायचं असेल तर शेजारी राहणाऱ्या मुसलमानाच्या हालचालीवर आपले बारीक लक्ष असले पाहीजे. त्यामूळे संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाला मी संशयाने बघू लागलो. त्याचबरोबर येशू ख्रिस्ताबद्दलही माझ्या मनात या बैठकांमूळे विष तयार होत गेले. मी जन्माला आलो ते मातंग समाजात आणि मातंग वस्तीत. वस्तीतील अनेक कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यांच्याबद्दलही माझ्या मनात द्वेष निर्माण झाला होता . हे ख्रिश्चन धर्मगुरू आपल्या हिंदू धर्मावर आक्रमण करतात, असं मी बोलू लागलो. नंतर लक्षात येत गेले, की हिंदू धर्मात प्रचंड विषमता आहे. मातंग समाज प्रचंड कष्ट करणारा आणि अठरा विश्व दारिद्र्य जगणारा समाज आहे. चर्चमधून पोटभर अन्न मिळते, रेशन मिळते आणि त्याचबरोबर मानसिक शांतता मिळते म्हणून ह्या गरीब मातंग समाजातील लोकांनी धर्मांतर केले.
मनात येणारे प्रश्न शाखेत विचारले तर टाळले जातात, असे अनुभव वारंवार यायला लागले. शाखा संपल्यावर प्रार्थनेचा कार्यक्रम असतो. ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे , त्वया हिंदूभुमे सुखं वर्तितो हं’, अशी ती प्रार्थना अनेकांना माहीत असेलच. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये मी सायंशाखा लावायचो. एकदा शाखा संपल्यानंतर प्रार्थना सुरू झाली. यादरम्यान माझ्या पायाला अचानक खुप मुंग्या चावल्या. म्हणून मी हललो. पाय झटकून खाजवू लागलो. प्रार्थना संपल्यानंतर माझ्या संघशिक्षकांनी मला लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. संघाच्या दंडाने मारलं. मारहाण चालू असताना आणि संपल्यावर मी याबद्दल विचारत राहीलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना भारताच्या राष्ट्रगीतापेक्षा श्रेष्ठ आहे, असं मला सांगितलं गेलं. मारहाणीचे असे अनेक हिंसक अनुभव मला येत गेले.
डोक्यामध्ये प्रश्नांचा कल्लोळ मात्र मार खावूनही थांबत नव्हता. स्वयंसेवकाने बिना मेंदूचे सैनिक व्हावे , असेच वारंवार शिकवले जात होते. फुलगाव ( ता. हवेली, जि. पुणे ) या गावातील शाळेमध्ये संघ प्रचारकांची बैठक होती . तिथे मला ‘प्रबंधक’ ही जबाबदारी दिली गेली. प्रबंधक म्हणजे पाहुण्यांची व पदाधिकाऱ्यांची व्यवस्था बघणारी व्यक्ती. संघाच्या अतिशय महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या भैय्याजी जोशी आणि मा. गो. वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या त्या बैठकीमध्ये मी प्रश्न विचारला. ‘मी दलित स्वयंसेवक आहे. आत्तापर्यंत संघाचे सर्व सरसंघचालक व इतर पदाधिकारी ब्राह्मण समुदायाचेच का ? दलित स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो का ?’ या प्रश्नाला उत्तर आलेच नाही, उलट मला धक्काबुक्की करून बाहेर काढले गेले. वरिष्ठांना असे प्रश्न विचारायचे नाहीत, असे दरडावून सांगितले गेले. माझ्याबाबतीत मारहाण, डावलणे , टाळणे हे प्रकार वाढत गेले. त्यामूळे प्रश्न विचारणारा व्यक्ती आरएसएसमध्ये टिकूच शकत नाही, हे माझे मत हळूहळू बनत गेले.
संघकार्यासाठी मी अनेक जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये प्रवास केला. २०१४ ला मी पुढचं प्रशिक्षण घेतलं. त्याला संघाच्या भाषेत ‘प्रथम शिक्षा वर्ग’ असे म्हणतात. हे २१ दिवसांचं निवासी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणाच्याआधी मी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात सक्रीय झालो. माझ्या मनावर मोदींचा करिश्मायुक्त प्रभाव निर्माण झाला होता. पुणे लोकसभा मतदारसंघाचे तेव्हाचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा प्रचार मी करू लागलो. पत्रक वाटणे, घरोघरी जाणे , घोषणा देणे, टू व्हीलर रॅलीमध्ये सहभागी होणे अशी कामे मी केली. गोपीनाथ मुंडे यांचा मी तेव्हा चाहता होतो. शिरोळे मुंडेंच्या जवळचे असल्याने मी भारावून काम केलं. एस.पी. कॉलेजमध्ये मोदींची तेव्हा प्रचारसभा झाली. मी मोदींच्या अगदी जवळ उभा राहून बेंबीच्या देठापासून बोंबलत होतो –“ मोदी, मोदी, मोदी, मोदी…!”
प्रचार संपल्यानंतर लगेच ‘प्रथम शिक्षा वर्ग’ सुरू झाला. १६ मे २०१४ रोजी निवडणुकीचा निकाल होता. प्रथम शिक्षा वर्गात मोबाईल वापरायची परवानगी नव्हती. आम्हाला निकालाची उत्सुकता होती. त्यामुळे वर्गातील फळ्यावर निकाल लिहीले जाऊ लागले. आमच्या घोषणा सुरू झाल्या. ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘सोनिया गांधी मुर्दाबाद’, ‘काँग्रेस मुर्दाबाद’ अशा घोषणा वाढत गेल्या. आपली सत्ता आल्याची सर्वांची भावना होती. आम्हाला तेव्हा काँग्रेस पक्ष देशद्रोहीच वाटायचा.
याचदरम्यान माझ्या वस्तीमध्ये शिक्षणाचा प्रकल्प राबावणाऱ्या संस्थेच्या एक कार्यकर्त्या काम यायच्या. त्यांचे जोशी आडनाव असल्यामुळे म्हणजेच ब्राम्हण असल्यामूळे त्या संघाच्याच असतील असा मी समज करून घेतला होता. त्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू लागलो. त्या कुतूहलाने माझं सगळं ऐकून घ्यायच्या. गांधीजींबद्दल माझ्या मनात प्रचंड द्वेष होता. गांधींनी देशाचे तुकडे केले, फाळणी केली असं मी स्पष्टपणे बोलून दाखवल्यावर शांतपणे त्यांनी मला गांधी भवनची माहिती दिली. मी गांधी भवनला गेलो. संदीप बर्वे यांच्याशी माझी ओळख झाली. संदीपदादाने स्वखर्चाने मला विविध शिबीरे आणि कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रभर सोबत नेलं. २०१५ साली अहमदनगर येथे सांगड संमेलनाला आम्ही गेलो. त्या संमेलनामध्ये अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विषयांवरची व्याख्याने, चर्चासत्र, गटचर्चा झाल्या. संमेलन तीन दिवसाचं होतं. उल्काताई महाजन, तिस्ता सेटलवाड, अश्विनी सातव – डोके, संदीप बर्वे, संमेलनाचे संयोजक आणि प्रसिध्द अभिनेते नंदू माधव अशी अनेक अभ्यासू लोकं तिथं होती. मोकळेपणाने बोलण्यासाठी जागा मिळाली. जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळाली. माझं म्हणणं मांडण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. माझे प्रश्न अर्ध्यामध्ये कुणी कापले नाहीत . खुप समाधान मिळाल्याने नवी दिशा सापडल्याची भावना होती. दुष्काळ, रोजगार, गरिबी निर्मूलन अशा अनेक रोजच्या जगण्या – मरण्याच्या प्रश्नांवरती चर्चा असायची. संघांमध्ये असं कधी बोललं जात नसल्याने हे नवं जग वेगळं वाटलं. इथं माणुसकीसाठी लढणारे कार्यकर्ते भेटले. धर्म पाळणारे परंतु ते त्यांच्या घरापुरता मर्यादीत ठेवणारे आस्तिक भेटले. नास्तिकही भेटले. सर्वात महत्वाचं म्हणजे इथला प्रत्येक माणूस कोणाचाही द्वेष करत नव्हता.
बेडूक जेव्हा डबक्यातून बाहेर येतो, तेव्हा डबक्याव्यतिरिक्तचे जग त्याला मोठे वाटायला लागते . तशी माझी अवस्था झाली होती. आरेसेस आणि संघशाखेपेक्षा जग खूप मोठं आहे. जगणे – मारण्याचे अनेक प्रश्न जिवंत असताना आपण धर्माची कट्टरता का पाळावी ? का दुसऱ्या धर्माच्या द्वेष करावा ? असे अनेक प्रश्न मला पडायला लागले. सांगड संमेलन संपल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम कधीच करायचं नाही हे मी मनाशी ठरवलं आणि संघाला शेवटचा राम राम केला. त्यानंतर संदीप बर्वे यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याशी माझी ओळख करून दिली. डॉ. सप्तर्षी खूप मोकळेपणाने चर्चा करायचे, अधून मधून हसवायचे आणि अधून मधून ह्या ब्राह्मणी व्यवस्थेला थोड्याफार शिव्या घालायचे. हा मला धक्का होता. मला वाटायचं हा माणूस स्वतः ब्राह्मण असून ब्राह्मणांना का शिव्या देतो ? ब्राह्मण आणि ब्राह्मणी व्यवस्था यातील फरक मला त्यांनी सांगितला, तेव्हा स्पष्टता आली. त्यांच्या शेजारी बसल्यावर माझ्या पाठीत एखादा तरी गुद्दा ते मारतील असं मला वाटायचं. तसाच मार खायची संघातली सवय होती. इथे मारापेक्षा चर्चा व्हायची. मनापासून आनंद व्हायचा. डॉ. सप्तर्षी माझे मित्र केव्हा झाले, ते माझं मलाच कळलं नाही. मार्गदर्शक – गुरूंच्या रूपात डॉ. सप्तर्षी भेटले. “सुदर्शन, तू महाराष्ट्र फिरून घे, तुला या समाजातली विविधता नक्की दिसेल. सामाजिक कार्यकर्त्यामध्ये अनेक चांगले गुण असावे लागतात, ते तुझ्यामध्ये आहेत,” असं ते म्हणाले आणि माझा आत्मविश्वास वाढला. गेली आठ वर्षे मी युवक क्रांती दल संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करत आहे. सध्या पुणे शहराचा सहसचिव या पदावर कार्यरत आहे. संदीप बर्वे यांच्यामुळे मी माणूस झालो आणि माझं जगणं समृद्ध झालं. जगायला दिशा मिळाली. मी संघातून बाहेर पडलो , याचा आज खुप आनंद वाटतो. कट्टर हिंदुत्ववादी राहिलो असतो तर कायम इतर धर्माचा द्वेष करत राहीलो असतो . मी खऱ्या अर्थाने माणूस झालो याचे मला खुप समाधान वाटते .

धन्यवाद !

लेखाचा संपादक
संदीप बर्वे
उपाध्यक्ष , युक्रांद , महाराष्ट्र आणि विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
9860387827
Sudarshan Chakhale

2 Comments
  1. Munir says

    खूपच आनंद झाला हा अप्रतिम लेख वाचून… ईश्वराला प्रार्थना करतो सर्वच आर एस एस कार्यकर्त्यांना सत्य मार्ग मिळावा.. आणि माणुसकी कायम जपली जावी…

    1. Musavir says

      परमेश्वर सर्वच rss कार्यकर्त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांना सत्य मार्ग मिळून भारताची एकता आणि अखंडता कायम अबाधित राहावी
      जय हिंद जय महाराष्ट्र

Leave A Reply

Your email address will not be published.