मोदींचा चेहरा भीतीदायक, तो भला चेहरा नाही – खासदार संजय राऊत यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

0 28
मोदींचा चेहरा भीतीदायक, तो भला चेहरा नाही
– खासदार संजय राऊत यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
छत्रपती संभाजीनगर : मोदींचे रामराज्य नाही, आम्हीच रामराज्य आणणार, देशात नौटंकी चालणार नाही. मोदींसारखा भयंकर चेहरा त्यांच्याकडे आहे. तो भीतीदायक आहे. तो भला चेहरा नाही. मोदींचा पक्ष ग्रामपंचायतदेखील जिंकू शकणार नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे, राजू राठोड, अ‍ॅड. अशोक पटवर्धन आदी उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, लोकांना हुकुमशाही नको आहे. लोकांना संविधान वाचवायचे आहे आणि त्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यावर जास्त आहे. ईव्हीएमची भीती बाळगू नका. दहा टक्के मतदान वाढवा, दहा टक्के मतदान वाढवले तर मोदींचा पक्ष ग्रामपंचायतदेखील जिंकू शकणार नाही. छत्रपती संभाजनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचीच हवा आहे. पाच वर्षांपूर्वीपण अशीच हवा होती, पण अपघात झाला. खैरे मात्र मनाने दिल्लीतच होते, असे राऊत म्हणाले.
देश काय त्यांच्या बापाचा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मोदींसारखा भयंकर चेहरा त्यांच्याकडे आहे. तो भीतीदायक आहे. तो भला चेहरा नाही. दहा वर्षांत या माणसाने भयंकर कांड केले. त्यामुळे देशाचे नुकसान झाले. अब की बार चारशे पारचा नारा त्यांनी दिला आहे, असा उल्लेख करून राऊत म्हणाले, देश काय त्यांच्या बापाचा आहे का? देशातील जनता ठरवेल कुणाला किती जागा मिळतील ते. मोदींना जास्तीत जास्त २०० जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ पेक्षा जास्त जागेवर यश मिळेल. भारतीय जनता पक्ष हा भाडोत्रींचा पक्ष आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.