राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने !

0 246
राजकीय पक्षअंधभक्त निर्मीतीचे कारखाने !
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे 
       मो. 9762636662
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा यासाठी विदेशी भटांनी वैदीक परंपरेप्रमाणे कोटीचंडी यज्ञ केला होता पण ह्या  यज्ञाच्या धुराड्यावर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल. म्हणून तर संभाजी महाराज म्हणालेत की, जे दैववादी असतात ते नामर्द असतात, जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात.’ त्यामुळे खरेच आपण मर्द आहोत का ?याचाही विचार लोकांनी व राजकीय पुढा-यांनी करावा. कारण, आजपर्यंत पाऊस पाडण्यासाठी, नवीन घराचे पुजन करण्यासाठी तसेच हवेतील विषाणूंचा नायनाट करण्यासाठी, माणूस दीर्घायुषी होण्यासाठी यज्ञ केला जातो हे ऐकल होत पण आता तर थेट कोर्टाचा निकाल बदलण्यासाठी यज्ञाच्या धुराड्याचा वापर केला जातोय हे पाहून आश्चर्य वाटत.
शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्यात शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदे गटात जाताना दिसत आहेत त्यामुळे सेनेवर मोठं संकट कोसळलं असून त्याचा वाद सध्या न्यायालयात चालू आहे. ‘मरता क्या न करता’ अशी सेनेची अवस्था झाल्याने सुप्रीम कोर्ट सुनावणीच्या पुर्वसंध्येला निकाल आपल्या बाजूने लागावा व सेनेवरील संकट टळावे यासाठी दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडून महापूजा आणि यज्ञ केला. यावेळी शिवसेनेचे काही नेतेही उपस्थित होते. (आँ. एकमत १९ जूलै २०२२) यज्ञाच्या माध्यमातून धुराडे काढणारे खैरे भष्माचा वापर करून शिंदे फडणवीस सरकार का पाडत नाहीत ?मेलेली माणस जिवंत करण्याची क्षमता असलेल खैरेचं भस्म कोर्टाचा निकाल बदलू शकत नाही ?त्यामुळे खैरेंना सांगावं वाटत की, तुमचा अंगारा धुपारा यज्ञ व त्यातून निघणारा धुराडा हा कवडीमात्र बहुजनांच्या हीताचा नाही. ह्या धुराड्यातून केवळ बुवा बाबा आम्मा आम्मी साध्वी व  अंधभक्तांची निर्मीती होत आहे.
गुरुचरित्राच्या नादी लागलेला माणूस कालांतराने भ्रमिष्ट होण्याची दाट शक्यता असते अस प्रबोधकार ठाकरे म्हणतात ते एकदम शंभर टक्के खर आहे. देशात भाजपचे भ्रमिष्ट समर्थक यज्ञातून धुराडे काढण्यात पटाईत नंबर आहेत अस म्हटल तरी चुकीच ठरणार नाही. कारण ह्यांना अंगारा व भस्माचा संसर्ग झालेला आहे, म्हणून तर राष्ट्रीय चिंतन मंचच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त २१ देव कन्या यांनी वैदिक विधीद्वारे यज्ञ केला आणि प्रथम गायत्री मंत्राचा जप करण्यात आला असे स्वामी बाबा विशुध्दानंद जी परहंस यांनी सांगितले. (भदैनी मिरर २० सप्टें २०२१) तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिध्दीविनायक मंदरीत यज्ञाचे दर्शन घेतले. https://youtu.be/jfBINbjuNf8तसेच यापुर्वी निलंगा मतदारसंघाचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दुष्काळग्रस्त भागात पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी निलंगा येथे लोककल्याणकारी विश्वशांती महायज्ञ केला. यात ५१ हजार जोडप्यांच्या हस्ते महायज्ञात आहुती देण्यात आली. (यशोगाथा संभाजी पाटील निलंगेकर) तसेच निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच आग्रा रोडवरील माहेश्वरी माँटेसरी बाल मंदिरात खासदार सतीश गौतम यांच्या विजयासाठी भाजप समर्थकांनी यशस्वी अपराजिता यज्ञ केला.  (अमर उजाला २४ मे २०१९ ) तसेच एकदा राज्यसभेत प्रदुषणावर संसदेची समिती गठीत करण्याचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर भाजपा खा. रामचंद्र जांगडा  म्हणाले की, गावांमध्ये आजारांचा प्रकोप होत असताना लोक हवन आणि यज्ञ करतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वेगवेगळे आजार बरे होण्यास मदत होते. आपले पूर्वज आपल्यापेक्षा मोठे वैज्ञानिक होते. माझ्या घरात मागील वर्षी जनता कर्फ्युच्या काळात १४ तास यज्ञ करण्यात आले. माझ्या पत्नीला डोळ्यांच्या एलर्जीचा त्रास होता. डॉक्टरांनी तिला धुरापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. असं असतानाही पत्नी अनुष्ठानासाठी बसली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण यज्ञाने माझ्या पत्नीचे डोळे बरे केले. तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी चांगलाच समाचार घेताना म्हटले की,  मला वाटतं आपल्याला आपलं डोकं साफ करण्यावरही विचार करायला हवा. आपलं राजकीय जीवन किती प्रदुषित आहे हे पाहता हे करावं लागेल. (लोकसत्ता ११ डिसें २०२१) यज्ञाच्या धुराने डोळ्यांचा त्रास दूर होत असता तर शहरातील डोळ्यांच्या दवाखान्यात दररोज होम पेटला नसता का ?फलप्राप्तीसाठी धुराड्याचा सहारा घेणा-या अंधभक्त़ाच्या डोक्यात होम पेटवण्याची गरज आहे कारण ह्या भक्तांच्या डोक्यात भुस्याव्यतिरिक्त आहे तरी काय ? यज्ञ केल्यामुळे सर्व प्रश्न जर मिटले असते तर देश जागतीक महासत्ता केव्हाच झाला असता. या यज्ञाचा वापर करून चीनला रसातळाला घालून पाकीस्तानचा नायनाट करता आला असता. यज्ञ होम हवन व त्यात केल्या जाणा-या मंत्राच पटण केवळ आणि केवळ थोतांड आहे म्हणून अध्यात्मवाद : श्रध्दा की अंधश्रध्दा ?या पुस्तकात प्रा. य.ना. वालावलकर म्हणतात की, गायत्री मंत्रात अथवा अन्य कोणत्याही मंत्रात कोणतेही सामर्थ्य, शक्ती नसते. मंत्रपठणाने ध्वनीव्यतिरिक्त अन्य कोणतीही उर्जा निर्माण होत नाही. काहीही घडत नाही. मंत्रसामर्थ्याने अमुक घडले आणि तमुक घडले असे केवळ पुराणांतील भाकडकथा आहेत. यज्ञ, आहुती, जपतप अशी कर्मकांडे आणि दक्षिणादान हे धर्मातील आदेश म्हणजे धूर्त ब्राम्हणांनी जनतेवर सत्ता गाजवण्यासाठी आणि त्यांची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी योजलेल्या युक्त्या आहेत. श्राद्धादी प्रकार ही अन्नाची नासाडी आहे.
देशातील सर्वच पक्षाचे राजकीय नेते हे संघ भाजपचे दलाल आहेत ?अस म्हटल तर काही चुकणार नाही कारण ह्यांच्या डोक्यात जो ब्राम्हणवाद आहे ती संघाची देण आहे. त्यामुळे यज्ञ होम हवन यांना विरोध करण्याऐवजी ते त्याला प्रोत्साहन देताना दिसतात त्यात शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यज्ञ करण्यात आला. (एबीपी लाईव्ह १४ मे २०१७) तसेच बदलापुरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयाबाहेर महागाई विरोधात आता तरी देवा मला पावशील का ?हे गाणे लावत राष्ट्रवादी काग्रेसच्या वतीने यज्ञ केला. (१७ जून २०२२) महागाई कमी करण्यासाठी व सध्दबुध्दी येण्यासाठी यज्ञ नसतो तर कडाडून विरोध करायचा असतो हे ज्यांना माहीत नाही ते यज्ञाचे धुराडे पेटवणार नाही तर काय करणार आहेत ?म्हणून नितेश राणे ट्विट करत म्हणतात की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सरकार टिकविण्यासाठी पाच तासांचा महायज्ञ करण्यात आला. (टाईम्स मराठी २९ मे २०२१) दुस-याच्या डोळ्यातल कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातल मुसळ दिसत नाही अशी अवस्था निलेश राणेंची झालेली दिसते. कारण ते ज्या देवेद्रजींच्या चरणावर लोटांगण घेतात त्यांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा जयघोष करण्यापुर्वी काय केले होते ?हे समजून घ्यावे. ज्यावेळी अजित पवारांचे बंड फसले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या काही तासांत मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. या सगळ्या घडामोडींचा उल्लेख Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra या पुस्तकात आहे. फडणवीस यांनी शपथ घेण्याआधी केलेल्या ‘मिरची हवन’चाही उल्लेख पुस्तकात आहे. मध्य प्रदेशच्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतले होते. उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार या ‘मिरची हवन’मुळे वाचल्याचे फडणवीसांना सांगण्यात आले होते. त्यानुसार फडणवीसांनी हे हवन केले होते. मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातले होते, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. (झी २४ तास २०२०).
यज्ञ होम व त्यातून निघाणारा धुर हा लोकांच्या आरोग्यासाठी, पाऊस पाडण्यासाठी, आयुष्य वाढविण्यासाठी, विजयी होण्यासाठी चांगला असतो तर मग साखर कारखाने, औद्योगीक वसाहतींच्या धुराड्यातून निघणारा धुर वाईट कसा ?धूर तो धूरच तो हानिकारकच असेल ना. पण एका ठिकाणी भटजीने पेटवलेली धुराडी फायद्याची तर दुसरीकडे सामान्य कामगारांनी पटवलेले धुराडे हानिकारक कसे ?ह्या प्रश्नांची उत्तरे ज्यांच्या अक्कलेपलीकडची आहेत ते लोक यज्ञाच्या ठिकाणी हजेरी लावून भक्त निर्मीतीचा वेग वाढवत असतात. काही दिवसापुर्वी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पत्रकारिता विभागात संघाचे लेक्चर ठेवण्याचा वाद ताजा असतानाच आणखी एका नामांकित महाविद्यापीठात चक्क महायज्ञ भरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या महायज्ञाला हजेरी लावली होती.पर्यावरणाच रक्षण, पर्यावरणाचं शुद्धीकरण करणे त्याच बरोबर विद्यार्थी आणि वैदिक शास्त्र या दोघांचा मेळ घालण्याच्या उद्धेशाने हा यज्ञ करत असल्याचं सांगत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी या महायज्ञाचं समर्थन केलं. (न्यूज १८ लोकमत १४ मे २०२०) तर तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या फार्म हाउसवर पाच दिवसांच्या ‘यज्ञम’ नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमावेळी एका मंडपाला अयुथ चांडी यज्ञामध्ये दुर्दैवाने आग लागली. (वेबदुनिया २८ डिसे २०१५) राजकारणी हे मतलबी व स्वार्थी असतात हे कोणीही नाकारू शकत नाही. यज्ञात राष्ट्रीय संपत्तीचा अंगारा करून पर्यावरणाच शुध्दीकरण होत हा निव्वळ थोंताडपणा आहे अस म्हटल तर काय चुकीच आहे. यज्ञ हा चांगले काम घडून येण्यासाठी जर केला जात असेल तर चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या अयुथ चांडी यज्ञामध्ये मंडपाला आग लागली कशी ?तरीपण चंदनाची तष्करी करून तुंबडी भरणारे चदंन तष्कर बाबा रामदेव ट्विट करत म्हणतात की, यज्ञ हवन रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश करतात. ह्या बाबाला विचाराव वाटत की, कोरोनाचा विषाणू हा हवेतून पसरतो तर मग पतंजलीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात होम पेटवुन कोरोना विषाणूचा नायनाट का केला नाही ?यज्ञातील धुरामुळे जर विषाणूचा नायनाट होत असेल तर नवनवीन व्हायरस येतातच कसे ?म्हणजे यापुर्वी जेवढे यज्ञ करून जी राष्ट्रीय संपत्तीची होळी केली त्यातून केवळ भटांची पोळी भाजली अस म्हणायच का ?
कोणत्याही कार्याची सुरुवात करताना होम-हवन, यज्ञ-याग करण्याची प्रथा, परंपरा सांगितली जाते. वास्तविक पाहता स्वाहा करणे म्हणजे अर्पण करणे होय. काही ग्रंथांनुसार, स्वाहाचा अर्थ योग्य पद्धतीने पोहोचवणे. हवनात अर्पण केलेली आहुती देवतांपर्यंत पोहोचवली जाते. फळे, मध, तूप, काष्ट, विविध सामुग्रींची आहुती दिली जाते. हवनातील आहुती देवतांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी, यासाठी अग्नीचा वापर केला जाऊ लागला. अग्नि मनुष्याला देवतांशी जोडणारे माध्यम आहे. (लोकमत ५ मार्च २०२२) अग्नि हे जर मनुष्याला देवतांशी जोडणारे माध्यम असेल तर मंदीरात भटांची गर्दी कशासाठी आहे ?मंदीरात अग्नि करून त्यात भट व पौराणीक साहित्यांची  होळी केल्यास मनुष्याला देवतेशी जोडले जाणार नाही का ?म्हणून तर डाँ. शरद अभ्यंकर ‘जरा शहाणे होऊ’ या पुस्तकात लिहतात की, ‘समाजाला उपयोग शून्य मात्र पैशाची प्रचंड उधळपट्टी हा चंगळवादाचा निकष लावल्यास आजकाल ठिकठिकाणी होणा-या यज्ञयागांची बरोबरी या बाबतीत इतर कोणतीही गोष्ट करु शकणार नाही. शतचंडी, लक्षचंडी असे एकसे बढकर एक यज्ञ करून सरपण, तूप, तेल, तांदूळ आणि लोकांचा वेळ अशा राष्ट्रीय महत्वाच्या गोष्टींचा इथे निष्कारण धूर करतात. विश्वशांती हे अशा यज्ञांचे उद्दिष्ट असते, असे सांगतात; पण यज्ञामुळे पलीकडच्या गल्लीतसुध्दा शांतता प्रस्थापित करण्यात यश लाभत नाही हे आपण जाणतोच.’
त्यामुळे शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटत की, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे व बाबा, बुवा, आम्मा, आम्मी, महतं असो की जंत हे केवळ अंधभक्ती निर्मीती करून त्यांना यज्ञाच्या माध्यमातून धुर्री देतात त्या धुर्रीच्या नादी लागून आयुष्याची होळी करू नका. कारण बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर पेरिआर आण्णाभाऊ यांनी कधीच होम पेटवा; भट जगवा अस सांगितल नाही. कारण डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की, भारतीय समाजात व्यक्तीपुजा व भक्तांचा थवा असतो त्यामुळे राजकीय आणि सामाजिक लोकशाही नेहमीच धोक्यात राहील. त्यामुळे तरुणांनो धर्माध भक्तांच्या थव्यात सामिल होऊ नका. तुम्ही यज्ञ व होमाच्या थोतांडापासून दूर राहून भक्त निर्मीतीच्या कारखान्यांना सुरूंग लावा तेव्हाच ख-या अर्थाने हे अंधश्रध्दा पसरवणारे विनाशकारी किटाणू भस्मसात होऊन धोक्यात असलेली लोकशाही भटमुक्त व समाज भयमुक्त होईल.
(सदरील लेख ३० जूलै २०२२ रोजी बामसेफचे मुखपृष्ठ दैनिक मुलनिवासी नायक मध्ये प्रकाशित झालेला आहे.)
Leave A Reply

Your email address will not be published.